राज्य राखीव पोलिस दलाची शंभर जवानांची एक तुकडी मुंब्रा शहरात तैनात
मुंब्रा :
राज्य राखीव पोलिस दलाची (नवी मुंबई क्रमांक 11) ची शंभर जवानांची एक तुकडी मुंब्रा शहरात तैनात करण्यात आली आहे. मुंब्रा पोलिस ठाण्याचे 160 अधिकारी व कर्मचारी सध्या परिस्थीतीवर नियंत्रण ठेवत असून त्यांना सहाय्य करण्यासाठी 23 होमगार्ड देखील पाठवण्यात आले मुंब्रा मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये नागरिकांचे रस्त्यावर उतरण्याचे प्रमाण कमी होत नसल्याने राज्य राखीव पोलिस दल(एसआरपीएफ) ला तैनात करण्यात आले आहे. एसआरपीएफची कुमक शहरात उपलब्ध झाल्याने नागरिकांना सक्तीने घरी बसण्यास भाग पडेल. स्थानिक पोलिस ठाण्याच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना यामुळे मदतीचा हात मिळेल. असे मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड,म्हणाले.
आता एसआरपीएफचे जवान उपलब्ध झाल्याने परिस्थिती हाताळण्यात अधिक सुकर जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मुंब्रा मध्ये संचारबंदीमध्ये देखील रस्त्यावर नागरिक फिरण्याचे प्रमाण अधिक असल्याने चिंता व्यक्त केली जात होती. पोलिसांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा 2005 अन्वये 40 वाहने जप्त करण्यात आली असून सात जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एसआरपीएफ ची एक तुकडी मुंब्रामध्ये तैनात करण्यात आली असल्याची माहीती एसआरपीएफ, गट क्रमांक 11,नवी मुंबई कमांडट सचिन पाटील यांनी दिली.