कोरोना प्रतिबंधासाठी महापालिका प्रशासन सज्ज : महापौर नरेश म्हस्के
महापौरांनी घेतली प्रशासनासमवेत आढावा बैठक
ठाणे
कोरोना या आजाराबाबत प्रतिबंधक उपाययोजनांसाठी ठाणे महापालिका सज्ज झाली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागसमितीत जेट स्प्रेद्वारे सोडियम हायपोक्लोराईटने निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली आहे. तसेच कासारवडवली, भाईंदरपाडा, शीळफाटा या ठिकाणी विलगीकरण कक्ष स्थापन केले असून ठाणे महापालिका प्रशासन प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजना करीत आहेत याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांच्या दालनात आज झालेल्या आढावा बैठकीत आज महापालिका विजय सिंघल यांनी दिली.
कोविड 19 संदर्भात ठाणे महापालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आढावा आज महापौर नरेश म्हस्के यांनी घेतला. यावेळी बैठकीस उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, अतिरिक्त आयुक्त 1 राजेंद्र अहिवर, अतिरिक्त आयुकत (2) समीर उन्हाळे, उपायुक्त ओमप्रकाश दिवटे, सचिन गिरी आदी उपस्थित होते.
यावेळी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी प्रशासनाने तयार केलेल्या कृती आराखड्याची माहिती दिली. कोरोनाबाबत प्रतिबंधक उपाययोजनेसाठी ट्रॅक्टर/ बोलेरो जीप जेट स्प्रे द्वारे सोडियम हायपोक्लोराईडने निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. यासाठी 10 ट्रॅक्टर्स, 10 बोलेरो, 10 अग्नीशमन दलाची वाहने, 80 पंप (मनुष्यबळ)तसेच दोन मोठी फवारणी यंत्रे तैनात करण्यात आली आहेत. प्रत्येक प्रभागसमितीमध्ये सकाळी 7 ते 3 व दुपारी 3 ते 5 या वेळेत सोडियम हायपोक्लोरेट फवारणी करण्याची काम सुरू असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
तसेच संपूर्ण शहरात नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबतची जनजागृती करण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार असून सर्व प्रभागसमितीतील सहाय्यक आयुकतांनी आपापल्या परिसरात जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानदारांना सोशल डिस्टान्स ठेवण्याबाबतच्या सूचना देण्याबाबतची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहे. महापालिकेतील आरोग्य विभागाकडून दैनंदिन आढावा घेतला जात आहे. तसेच शहरात स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेण्याचे आदेशही संबंधित विभागाला देण्यात आले असून सद्यस्थितीत ठाणे महापालिका प्रशासन सर्वतोपरी उपाययोजना करीत असल्याचे आयुक्त विजय सिंघल यांनी या आढावा बैठकीत सांगितले.