बदलापूर-अंबरनाथ दरम्यानच्या चिखलोली स्थानकाचा मार्ग अखेर मोकळा; रेल्वे मंत्रालयाची मंजुरी
 
ठाणे: गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेलं बदलापूर-अंबरनाथ दरम्यानच्या चिखलोली रेल्वे स्थानकांच भिजत घोंगडं अखेर मार्गी लागलं आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने चिखलोली रेल्वे स्थानकाला मंजुरी दिली असून त्यामुळे या स्थानकाचे काम लवकरच सुरू होणार आहे. नवं स्थानक होत असल्याने बदलापूर आणि अंबरनाथ परिसरातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नव्या चिखलोली रेल्वे स्थानकाचं काम 2023 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान मोठं अंतर आहे. शिवाय चिखलोली परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रवासी आहेत. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे स्थानक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चिखलोली स्थानकाच्या बांधकामासाठी 10,947 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन (एमआरव्हीसी) हा भार उचलणार आहे. हा प्रकल्प एमयूटीपी-3 एचा भाग असणार आहे. रेल्वे प्रशासनाने चिखलोली स्थानकासाठीच्या जागेची नुकतीच पाहणी केली होती. जमिनीची मोजणीही करण्यात आली होती. कल्याण-बदलापूर दरम्यान होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाचा चिखलोली स्थानक एक भाग असणार असल्याचं रेल्वे सूत्रांनी सांगितलं.

नवं रेल्वे स्थानक होत असल्याने प्रवासी संघटनेने रेल्वेचे आभार मानले आहेत. नव्या रेल्वे स्थानकामुळे बदलापूर आणि अंबरनाथ स्थानकावरील गर्दी कमी होण्यास मदतच होणार असल्याचं प्रवासी संघटनेने म्हटलं आहे. चिखलोली स्थानक व्हावं ही गेल्या दहा वर्षांपासूनची मागणी होती. नव्या स्थानकामुळे बदलापूर-अंबरनाथ दरम्यानची गर्दी तर कमी होणार आहेच, शिवाय या दोन्ही स्थानकातील अंतरही कमी होणार आहे, असंही प्रवासी संघटनेने म्हटलं आहे.

बदलापूर आणि अंबरनाथ स्थानका दरम्यान सहा ते सात किलोमीटरचं अंतर आहे. या दोन्ही स्थानकांदरम्यान तब्बल दहा मिनिटांचं अंतर आहे. त्यामुळे चिखलोली आणि परिसरातील गावात राहणाऱ्यांना रेल्वे पकडण्यासाठी बदलापूर किंवा अंबरनाथला जावे लागते. आता नवं स्टेशन झाल्याने या नागरिकांची ही पायपीट थांबणार आहे.