ऐतिहासिक चैत्यभूमीचा कायापालट होणार; भाजप - सेनेत श्रेयवादासाठी चढाओढ


मुंबई: दादर येथील ऐतिहासिक चैत्याभूमिचा लवकरच कायापालट होणार आहे. पालिकेच्या माध्यमातून या ठिकाणाचे सुशोभीकरण, दुरुस्ती आणि विकास केला जाणार आहे. या कामासाठी २९ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 


मात्र, चैत्यभूमीच्या विकासाच्या मुद्द्यावरुन भाजप सेनेत मात्र श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. चैत्यभूमीचा विकास राज्य सरकारकडून आलेल्या निधीतून होत असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे हे काम आमच्या पुढाकारामुळे होत असल्याचा दावा भाजपने केला आहे.


दरम्यान, यंदा कोरोनाच्या संकटामुळे महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर लोकांनी गर्दी करु नये, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. यासंदर्भात बुधवारी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी महापालिका आणि चैत्यभूमी सदस्यांशी चर्चा केली. महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरुन थेट प्रक्षेपण केलं जाईल. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अनुयायांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. राज्यातील काही अनुयायी आले तर त्यांना चैत्यभूमीवर जाता येणार नाही. अशोकस्तंभाजवळ थांबून त्यांना दर्शन घ्यावं लागेल, असंही मुंडे यांनी सांगितलं. महापालिका आणि पोलिस यांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेशही राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.


अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे ज्याप्रमाणे थेट प्रक्षेपण झाले तसेच प्रक्षेपण चैत्यभूमीवरुन होईल. त्यामुळे देशभरातील नागरिकांना घरबसल्या चैत्यभूमीचे दर्शन घेता येईल. या चित्रिकरणाचा दर्जा उत्कृष्ट ठेवण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात आले आहेत.


2023 पर्यंत इंदूमिल स्मारक पूर्ण होणार- मुंडे


इंदूमिल स्मारकाची उंची 100 फुटाने वाढवण्यात आली आहे. हे स्मारक मार्च 2023 पर्यंत तयार होऊन नागरिकांसाठी खुलं करण्यात येईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. स्मारकाचे उद्घाटन होण्यापूर्वी 2 महिने आधीच स्मारक तयार असावे, असे आदेश धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. मार्च 2023 पर्यंत इंदूमिल स्मारक पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं मुंडे म्हणाले.