जळगाव : दुचाकी घसरल्याने ट्रकच्या चाकाखाली येऊन दुचाकीस्वार पिता-पूत्र जागीच ठार झाले आहेत. हा भीषण अपघात (Accident) आज (मंगळवारी) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या नेरी गावाजवळ घडला. या अपघाती घटनेचा पोलीस तपास सुरू असून दोन्ही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचं सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेख रशीद शेख कालू (वय 65) आणि त्यांचा मुलगा शेख आबीद शेख रशीद (वय 25) अशी अपघातात ठार झालेल्या पिता-पुत्रांची नावं आहेत. ते जामनेर तालुक्यातील वाघरी इथले रहिवासी होते. दोघांच्या अशा अकाली जाण्यामुळे संपूर्ण शेख कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. ऐन दिवाळी ही घटना घडल्यामुळे गावातही शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेरी इथं दर मंगळवारी गुरांचा बाजार भरतो. शेख रशीद हे गुरांचे व्यापारी असल्याने ते त्यांचा मुलगा शेख आबीद सोबत नेरीच्या बाजारात येण्यासाठी निघालेले होते. नेरी गावापासून काही अंतरावर त्यांची (एमएच 19 डीएल 4465) क्रमांकाची दुचाकी रस्त्यावरील चिखलामुळे घसरली.
यामुळे दोघेही बाजूला चालणाऱ्या (जीजे 15 यूयू 1726) क्रमांकाच्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली आले. ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर पुढील तपास सुरू आहे.