ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या विविध समितीच्या सभापतीपदाची निवडप्रक्रिया पूर्ण झाली असून स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे संजय भोईर यांची बिनविरोध निवड झाली असून नऊ प्रभागसमितीवर देखील अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये बहुतांश महिला नगरसेविकांवर जबाबदारी सोपविण्यात आली असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.
ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती, परिवहन समिती व नऊ प्रभागसमित्यांच्या सभापती अध्यक्षपदाची निवडणूक वेबिनारच्या माध्यमातून बुधवार दिनांक 18 नोव्हेंबर व गुरूवार दिनांक 19 नोव्हेंबर 2020 रोजी पार पडली. स्थायी समिती सभापतीपदी संजय भोईर, परिवहन सभापती म्हणून विलास जोशी यांची निवड झाली आहे.
नौपाडा-कोपरी, वागळे, लोकमान्य- सावरकरनगर, वर्तकनगर, माजिवडा-मानपाडा, उथळसर, कळवा, मुंब्रा वदिवा प्रभागसमितीच्या अध्यक्षपदी अनुक्रमे नम्रता राजेंद्र फाटक, एकता एकनाथ भोईर, आशा संदीप डोंगरे, राधिका राजेंद्र फाटक, भूषण देवराम भोईर, वहिदा मुस्तफा खान, वर्षा अरविंद मोरे, दिपाली मोतीराम भगत व सुनिता गणेश मुंडे यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे यावेळी सर्व निवडणुका बिनविरोध पार पडल्या असून महापालिकेच्या विकासाला एक वेगळी चालना मिळणार असल्याचे मत महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले आहे. तसेच महापालिकेच्या पाच विशेष समित्यांचे गठन देखील करण्यात आले असून या समिती सभापतीपदाची निवड देखील येत्या काही दिवसात पार पडणार असल्याचे माहिती महापौरांनी दिली. सर्व सभापती व प्रभाग समिती अध्यक्ष यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल महापौर नरेश म्हस्के यांनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.