मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 8 वा (17 नोव्हेंबर 2020) स्मृतीदिन. दरवर्षी या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर जाऊन त्यांना अभिवादन करत असतात. यंदा मात्र कोरोनाचे सावट असल्याने गर्दी करू नका, संयम पाळा, जेथे आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्या, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर अभिवादन केले. यावेळी उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, सुपुत्र आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला अभिवादन केले.
उद्धव ठाकरे यांचे कुटुंब केवळ पाच ते दहा मिनिटं या ठिकाणी उपस्थित होते. या आधी शिवसेना खासदार संजय राऊत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवतीर्थावर बाळासाहेबांना अभिवादन केले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थावर गर्दी करु नका असे आवाहन केल्याने सध्या या ठिकाणी गर्दी कमी दिसत आहे.
कोविड 19 चा संसर्ग सुरू असल्यामुळे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या सर्व शिवसैनिकांना मास्क आणि शारिरीक अंतर ठेवणं बंधनकारक करण्यात आले आहे.