अँटीजन टेस्टींग सेंटर्स कार्यान्वित: तीन दिवसात १५७१ टेस्ट, ३३१पॉझिटीव्ह
ठाणे
ठाणे शहरातील चाचणीची क्षमता वाढविण्याच्यादृष्टीने महापालिकेच्यावतीने नऊ प्रभाग समितीतंर्गत कोवीड १९ रॅपिड अँटीजन किटसच्या माध्यमातून चाचणी करण्यासाठी ९ ठिकाणी चाचणी केंद्रे सुरू करण्यात आली असून या केंद्रामध्ये गेल्या तीन दिवसांत जवळपास १५७१ चाचणी करण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण ३३१ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
महापालिकेने एकून १ लक्ष कोवीड १९ ॲंटीजन टेस्टींग किटस मागविले आहेत. या रॅपिड किटसच्या माध्यमातून चाचणी करण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीमध्ये टेस्टींग सेंटर्स कार्यान्वित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले होते.
या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात सर्व प्रभाग समित्यांमधे युद्ध पातळीवर चाचणी केंद्राची निर्मिती करण्यात आली. या सर्व प्रभाग समित्यांमध्ये ही चाचणी केंद्रे निर्माण करण्यात आली असून सोमवारपासून ही चाचणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
या नऊ केंद्रांमध्ये सोमवारपासून एकूण १५७१लक्षणे असलेल्या व्यक्तींची चाचणी करण्यात आली. यामधून एकूण ३३१ व्यक्तींच्या चाचण्यांचे निकाल पॉझिटीव्ह आले आहेत.