सतत वाढणाऱ्या लॉकडाऊनला सरनाईक यांनी केला विरोध
भाईंदर:
मीरा-भाईंदरमध्ये 18 जुलैनंतर लॉकडाऊन वाढवण्यास आ.प्रताप सरनाईक यांनी विरोध दर्शवल्याने आयुक्तांनी तुर्तास त्यावर सहमती दर्शविल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. सतत वाढणाऱ्या लॉकडाऊनला सरनाईक यांनी विरोध दर्शवून लोकांची खालावलेली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी 18 जुलैनंतर लॉकडाऊन वाढवण्यात येऊ नये, अशी मागणी आयुक्तांकडे केली असता आयुक्तांनी त्याला तूर्तास मान्य केल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
मीरारोड येथील स्व. मीनाताई ठाकरे आणि भाईंदर पूर्वेकडील स्व. प्रमोद महाजन सभागृहात म्हाडामार्फत बांधकाम सुरू असलेल्या डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर येत्या 25 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात येणार आहे. पालिकेने मीरारोडच्या आरक्षण क्रमांक 302 वर 352 खाटांचे हंगामी स्वरूपातील कोविड 19 रुग्णालय म्हाडा, सिडको व एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला असून त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. यामुळे तातडीची बाब म्हणून भाईंदर पूर्वेकडील स्व. बाळासाहेब ठाकरे मैदानात एक हजार खाटांचे तात्पुरते कोविड 19 रुग्णालय सुरू करण्याकरिता पालिकेने निविदा काढली आहे. पालिकेने शहरात रॅपिड अँटिजन टेस्ट मोहीम सुरू केली असून त्यासाठी राज्य शासनाने चार हजार किट उपलब्ध करून दिले आहेत. आणखी एक लाख किट खरेदीचा प्रस्ताव पालिकेने राज्य शासनाकडे निधी उपलब्धतेसाठी पाठवला आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी त्यासाठी पाठपुरावा करण्याचे मान्य केले.