ठाणे महापालिकेच्या अजब कारभाराने गोकुळ नगरवासिय त्रस्त  
ठाणे महापालिकेच्या अजब कारभाराने गोकुळ नगरवासिय त्रस्त  

 


ठाणे


गोकुळ नगर मधील एका इसमाला 15 दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती.  त्यांच्यावर रुग्णालयात योग्य ते उपचार झाले होते आणि या दरम्यान त्यांचे कुटुंबिय होम कोरोंटाईन होते. 15 दिवसांनंतर हा इसम कोरोनामुक्त होऊन घरी परतला आहे. मात्र ठाणे महापालिकेच्या अजब कारभाराने येथील रहिवाशांना धक्काच बसला आहे. ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त श्री. पाटोळे हे आज सकाळी दोन बस, वैद्यकीय पथक असा फौजफाटा घेऊन गोकुळ नगर येथे आले. ज्या इसमाला कोरोनाची बाधा झाली होती त्यांच्या आजुबाजुच्या घरातील रहिवाशांना भाईंदर पाडा येथील कोरोंटाईन सेंटर ला घेऊन जाण्याची प्रक्रिया करत होते.  ज्याला कोरोना झाला आहे तो रुग्ण उपचार घेऊन घरी परतला असतांना आता विलगीकरण कक्षात ठेवण्याचा अट्टहास अधिकारी करत असल्याने रहिवासी संतप्त झाले होते. स्थानिक नगरसेवक कृष्णा पाटील यांना या बाबत माहिती मिळताच त्यांनी सदर ठिकाणी धाव घेतली. स्थानिक नगरसेवकाला विश्वासात न घेता अशा प्रकारे बळजबरीने विलगीकरण कक्षात घेऊन जाण्याबाबत आक्षेप घेत जाब विचारला. कोणतीही लक्षणे नसतांना अशा प्रकारे विलगीकरण कक्षात घेऊन जाण्याला रहिवाशांनी ठाम नकार दिला. तसेच विलगीकरण कक्षात कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. कोणतीही लक्षणे नसतांना विलगीकरण कक्षात ठेवल्यानंतर तेथील लोकांना कोरोनाची नंतर बाधा झाल्याचे या निदर्शनास आणून दिले गेले. बराच वेळ वादावादिनंतर अखेर या पथकाला रिकम्या हाताने परतावे लागले.