कोरोना बाधीत रुग्णांसाठी कामगार हॉस्पीटलचा वापर करा

कोरोना बाधीत रुग्णांसाठी कामगार हॉस्पीटलचा वापर करा


मनोज शिंदे यांचे महापलिका आयुक्तांना पत्र


ठाणे:


कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी महापालिकेकडून नवीन रुग्णालये उभारली जात आहेत. मात्र वागळे इस्टेट भागात कामगार हॉस्पीटल हे कोवीड रुग्णालय म्हणून का वापर केला जात नाही, असा सवाल कॉंग्रेसचे ठाणे  शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी उपस्थित केला आहे. आज शहरात विविध ठिकाणी मोकळी मैदाने इतर ठिकाणांचा शोध सुरु आहे.परंतु कामगार रुग्णालय हे अद्ययावत असल्याने त्याचा वापर तत्काळ करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीचा विचार केला गेला नाही तर कॉंग्रेस स्टाइलने आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.


 एकीकडे रुग्णालयाचा शोध घेतला जात असातांना वागळे इस्टेट भागात अद्ययावत असे कामगार रुग्णालय उभे आहे.चार मजली इमारतीत 1 हजाराहून अधिक खाटा उपलब्ध आहेत, कोरोनामुळे येथे इतर आजारांचे रुग्णही कमी संख्येत येत आहेत.येथे डॉक्टर आणि नर्सेस देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रशासनाचा हा खर्च देखील वाचणार आहे. परंतु असे असतांनाही या रुग्णालयकडे का दुर्लक्ष केले जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबतीत तत्काळ निर्णय व्हावा म्हणून त्याचे ट्वीट देखील केले असल्याचेही त्यांनी सांगितले.हे रुग्णालय कोवीड साठी का ताब्यात घेतले जात नाही,याची स्पष्टता करावी,हे रुग्णालय कोवीडसाठी केव्हा पर्यंत खुले होईल याचेही उत्तर त्यांनी मागितले आहे.या संदर्भात तत्काळ निर्णय घ्यावा अन्यथा कॉंग्रेस स्टाइलने आंदोलन केले जाईल असा इशाराही मनोज शिंदे यांनी दिला.