... तरीही रुग्णांची फरफट सूरुच

... तरीही रुग्णांची फरफट सूरुच


ठाणे :


रविवारी एका रुग्णाला दोन दिवस अॅम्ब्युलन्स न मिळाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. महापालिकेने शहरात १०० हून अधिक अॅम्ब्युलन्स उपलब्ध केल्या आहेत. तरीदेखील रुग्णांचे हाल होत आहेत. ठाणे परिवहन सेवेने ३० बसचे अॅम्ब्युलन्समध्ये रूपांतर केले खरे, मात्र त्यामध्ये तंत्रज्ञाचे कामही चालकाला करावे लागत आहे. याशिवाय व्हेंटिलेटरची कमतरता दिसत आहे. त्यामुळे एखाद्याने कॉल करून रुग्णवाहिका मागवली, तर व्हेंटिलेटर नाही, त्यात बिघाड असल्याचे सांगितले जात आहे.


ठामपाने बेडची माहिती अॅपद्वारे देणे सुरू केले होते. त्यासाठी महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन कक्षात कंट्रोल रूमही तयार केली आहे. तेथे तीन शिफ्टमध्ये एकेक डॉक्टरची नियुक्ती केली आहे. परंतु, आता तेथील डॉक्टरही कॉल घेऊन कंटाळले असून, ते कॉल घेण्यास असमर्थता दर्शवित आहेत. त्यामुळे रुग्णाला चार ते पाच तास खोळंबत राहावे लागत आहे.