स्फोटक फाईल्स भस्मसात करण्यासाठीच हा आटापिटा - नारायण पवार
ठाणे
शहर विकास विभागात काल (१५ जुन) रात्री शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत काही संगणक आणि फाईल्स नष्ट झाल्याचे समजते. या संदर्भात अद्यापि पालिकेकडून काहीही जाहीर करण्यात आलेले नाही. महापालिकेच्या शहर विकास विभागातील कोट्यवधींच्या गैरव्यवहारांमुळे आगीचे सावट असल्याची भीती २६ फेब्रुवारी रोजी व्यक्त करून आयुक्तांकडे उपाययोजनांची विनंती भाजपाचे नगरसेवक नारायण पवार यांनी केली होती. मात्र, आता चार महिन्यांतच शहर विकास विभागात `आगीचा ट्रेलर’ दिसला. `स्फोटक फाईल्स भस्मसात करण्यासाठीच हा आटापिटा सुरू असल्याचा आरोप करीत पवार यांनी सुमारे साडेपाच वर्षांच्या फाईल्स सीआयडीने ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. तसेच या आगीची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे केली आहे. संगणकाला आग लावल्यानंतर संपूर्ण शहर विकास विभाग खाक करण्याचा डाव फसला असावा, असा संशय भाजपा नगरसेवक नारायण पवार यांनी व्यक्त केला आहे. सीआयडीने शहर विकास विभागातील गेल्या साडेपाच वर्षांच्या कालावधीतील सर्व फाईल्स तत्काळ ताब्यात घ्याव्यात, अशी मागणीही पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी वेळीच पावले न उचलल्यास, कोट्यवधींचा भ्रष्टाचार गडप केला जाईल, अशी भीतीही व्यक्त केली.