अधिगृहित खासगी रूग्णालयाचे डॅक्टर्स-कर्मचारी कामावर रूजू न झाल्याने
गुन्हा दाखल होणार- महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचा निर्णय
ठाणे
ठाणे शहरामध्ये कोरोना कोव्हीड 19 चा सामना करण्यासाठी आणि कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी महपालिकेने अधिगृहित केलेल्या खासगी रूग्णालयातील डॅाक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी त्या त्या रूग्णालयांमध्ये कामावर उपस्थित न राहिल्याने संबंधित डॅाक्टर्स आणि इतर कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत. याकामी महापालिकेच्या तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
ठाणे शहरामध्ये कोरोना कोव्हीड 19 चा सामना करता यावा आणि रूग्णांवर तातडीने उपचार करता यावेत यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने अनेक खासगी रूग्णालये त्यामध्ये काम करणाऱ्या डॅाक्टर्स आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांसह अधिगृहित करण्यात आली आहेत. महापालिका प्रशासनाने यापूर्वी तसे आदेशही निर्गमित केले आहेत. तथापि कौशल्या हॅास्पीटल, होरायझन प्राईम आणि ठाणे हेल्थ केअर सेंटर या रूग्णालयातील डॅाक्टर्स आणि इतर कर्मचारी हे सेवेत हजर झालेले नाहीत सदरची बाब लक्षात घेवून या तीनही हॅास्पीटलमधील सेवेत हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहिता (45ॲाफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत. यासंदर्भात होरायझन प्राईम रूग्णालयासाठी डॅा. अनिता कापडणे, ठाणे हेल्थ केअरसाठी डॅा. शलाका खाडे आणि कौशल्या हॅास्पीटलसाठी डॅा. अश्विनी देशपांडे हे वैद्यकीय अधिकारी प्राधिकृत करण्यात आले आहेत.