अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरातील दुकाने खुली करण्याचा प्रस्ताव

अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरातील दुकाने खुली करण्याचा प्रस्ताव


अंबरनाथ


कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील विविध दुकाने मार्च महिन्यापासून बंद आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना परवानगी असली तरी आजही कपडे, पादत्राणे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दुरुस्ती, गृहोपयोगी वस्तू, बांधकाम साहित्य, शालेय साहित्य, खाद्यपदार्थाच्या थेट विक्रीची दुकाने बंद आहेत. तसेच अनेक दुकानातील नाशवंत मालाची मुदतही संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी आणि दुकानदारांचे नुकसान टाळून करोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत दुकाने सुरू करता येतील का, याबाबत शहर पातळीवर प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू होते. नुकतेच अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या शहरांबाबतचा असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला आहे, अशी माहिती प्रांतअधिकारी तसेच कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकेचे प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी दिली. टाळेबंदीचा चौथा टप्पा संपत आला असताना जिल्हा प्रशासनाने अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर शहरात सवलतींचा मोठा मार्ग खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. 


जीवनावश्यक वस्तूंसह ज्या गोष्टींमुळे नागरिकांना जगण्यात अडचणी येत आहेत, अशी दुकाने सुरू करणे आवश्यक असल्याचेही गिरासे यांनी सांगितले. तसेच पावसाळापूर्वीची देखभाल, दुरुस्तीला परवानगी मिळाली असली तरी त्यासाठीच्या साहित्याची दुकाने अजूनही बंद आहेत. बांधकाम साहित्याची दुकानेही बंद असून अनेक दुकानांतील साहित्याची मुदत संपत आल्याने ते वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे अशा दुकानांनाही सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी प्रस्ताव दिला असून येत्या काही दिवसांत त्याला मंजुरी मिळू शकते. त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरसारख्या शहरांमधील दुकाने लवकरच सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दुकाने सुरू करताना सामाजिक अंतर टाळणे, मुखपट्टीचा वापर आणि जंतुनाशकांचा वापर करणे अनिवार्य ठरणार आहे. त्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन ग्राहक आणि विक्रेता अशा दोघांना करण्यात येणार आहे. नागिरकांनी स्वत:हून काळजी घेणे गरजेचे असून ज्या ठिकाणी नियमांचे पालन होताना दिसत नसल्यास त्याठिकाणी कारवाईचा बडगाही उगारला जाणार आहे.