१० हजार बॉटल होमिओपॅथी गोळ्यांचं शिवसेना करणार वाटप
ठाणे
कोरोनाचा वाढत संसर्ग लक्षात घेऊन नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी शिवसेना प्रभाग क्र -१९ च्या वतीने नागरिकांना होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढणे गरजेचे आहे.त्यासाठी ठाणे महापालिका प्रभाग क्र -१९ मधील प्रत्येक व्यक्तीला नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण समिती सभापती,स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे व वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले-जाधव यांच्या वतीने ‘आर्सेनिक अल्बम -३०’ या होमिओपॅथी गोळ्या देण्यात येणार आहेत. सुमारे १० हजार बॉटल होमिओपॅथी गोळ्या नागरिकांना वाटप करण्यात येणार असल्याचे नगरसेवक विकास रेपाळे यांनी सांगितले .
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने या गोळ्या उपयुक्त असल्याचे प्रमाणित केले आहे. तर इतर देशांमध्ये या गोळ्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वाटल्या गेल्या आहेत.त्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढ्यात या होमिओपॅथी गोळ्यांना फार महत्व आहे.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी माणसाच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढली पाहिजे.त्यासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने होमिओपॅथी ‘आर्सेनिक अल्बम -३०’ या गोळ्यांचे रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या गोळ्या म्हणून जाहीर केल्या आहेत. या गोळ्या प्रत्येक व्यक्तीला आपण घरपोच वाटणार आहोत .विशेष म्हणजे या गोळ्या नागपूर येथील कंपनीतून मागवण्यात आल्या असून सुरक्षितेच्या दृष्टीने या गोळ्यांचे पॅकिंग मशीनच्या सहाय्याने करण्यात आले असून बॉटल संपूर्णतः सीलबंद आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेण्यात आली असून नागरिकांनी निश्चिंत याचे सेवन करावे असे शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे यांनी सांगितले . चार गोळ्या तीन दिवस सकाळी उपाशी पोटी अशी प्रतिमहिना घेणे गरजेचे आहे. असे तीन महिने घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे आम्ही प्रत्येकाला या गोळ्या उपलब्ध करून देणार आहोत.पहिल्या टप्प्यात १० हजार बॉटल गोळ्या प्रभागामध्ये वाटप करणार असून कोरोना विरुद्धच्या लढ्यात या गोळ्या निश्चितच यश मिळवून देतील असा विश्वास शिक्षण मंडळ समिती सभापती विकास रेपाळे यांनी व्यक्त केला आहे. या गोळ्या खाल्याने आपल्याला कोरोना होणार नाही असा समाज न करता नागरिकांनी कोरोना संसर्ग होणार नाही यासाठी खबरदारी घेतलीच पाहिजे कारण या गोळ्या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहेत हे सर्वानी लक्षात ठेवणे गरजेचे आहे असे वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले -जाधव यांनी सांगितले