कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी करा- ना. शिंदे, ना. डॅा. आव्हाड यांच्या सूचना

क्वारंटाईन सेंटर्समधून तक्रारी येता कामा नयेत
कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी करा
ना. शिंदे, ना. डॅा. आव्हाड यांच्या महापालिका आणि पोलिस आयुक्तांना सूचना


ठाणे (28) ठाणे शहरात महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटर्स तसेच आयसोलेशन सेंटर्समधून सध्या तक्रारी प्राप्त होत नाहीत ही समाधानाची बाब असली तरी भविष्यात या सेंटर्समधून तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. डॅा. जितेंद्र आव्हाड यांनी महापालिका आयुक्तांना केल्या. त्याचबरोबर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी करण्याबाबत मंत्री मंत्री द्वयांनी यावेळी ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना सूचित केले. दरम्यान यावेळी जे-जे निर्णय बैठकित घेतले गेले आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करावी या अशा सूचना महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी केल्या.
ठाणे शहरामध्ये वाढत असलेल्या कोरोना बाधितांच्‌या संख्येच्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि नाय डॅा. जितेंद्र आव्हाड यांनी महापालिका मुख्यालयात बैठक आयोजित केली होती. शहरामध्ये कोरोना बाधितांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. पण अशावेळी जे गंभीर स्वरूपाचे रूग्ण आहेत त्यांची रोजच्या रोज माहिती घेवून त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखविली. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी करण्याची गरज आहे. विशेषत: लोकमान्यनगर, वागळे प्रभाग आणि मुंब्रा या प्रभागात कंटोनमेंट झोनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सूचना या बैठकीत ना. शिंदे आणि ना. डॅा. आव्हाड यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आल्या.
सुरूवातीच्या काळात क्वारंटाईन आणि आयसोलेशन सेंटर्समधून तक्रारी यायच्या पण आता तेथून तक्रारी येत नसल्याबाबत समाधान व्यक्त करून भविष्यात या सेंटर्समधून तक्रारी येता कामा नयेत. या सेंटर्समधील लोकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घ्या अशा सूचना पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिल्या. तर कळवा आणि मुंब्रा या परिसरात क्वारंटाईनची सुविधा वाढविण्याबरोबरच त्या परिसरात कोव्हीड हॅास्पीटल्सची संख्या वाढविण्याच्या सूचना करतानाच कौसा येथील रूग्णालय तातडीने सुरू करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी असे गृहनिर्माण मंत्री ना. डॅा. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
यावेळी आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचना लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या मनातील भीती आणि गैरसमज दूर करण्यासाठी माहिती, शिक्षण आणि संपर्क अभियान मोठ्या प्रमाणात वाढविण्यावर शिक्कामोर्तब करताना कोणतीही लक्षणे नसलेल्या रूग्णांना हास्पीटलमध्ये दाखल न करता त्यांना आयसोलेशन सेंटर्समध्ये किंवा हॅाटेल्समध्ये ठेवण्याबाबत कार्यवाही करावी जेणेकरून गरजू रूग्णांना हॅास्पीटलचे बेड उपलब्ध होतील असे मंत्री द्वयांनी यावेळी स्पष्ट केले.