20 लाख कोटींचे विशेष आर्थिक पॅकेजची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा
नवी दिल्ली.
कोरोनाच्या रुपात आलेल्या संकटाने जगाला उद्ध्वस्त केले आहे. जगाने असे संकट कधीच पाहिलेले नाही. देशावरही अभूतपूर्व संकट आले आहे. या संकटात सर्वांनी नियमांचे पालन करून पुढे जायला हवे. देशव्यापी लॉकडाउनचा चौथा टप्पा येत्या 18 मे पासून नव्या स्वरुपात लागू केला जाणार आहे. सोबतच, अर्थव्यवस्थेला भरारी देण्यासाठी 20 लाख कोटींचे विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. कोरोना व्हायरस आणि देशव्यापी लॉकडाउनवर देशाच्या जनतेशी थेट संवाद साधला.
देशात मांगणी वाढवण्यासाठी तसेच ती पूर्ण करण्यासाठी आपला पुरवठा करणारी साखळी प्रत्येक स्तरावर मजबूत करणे आवश्यक आहे. हीच सप्लाय चेन मजबूत करताना त्यामध्ये या मातीचा आणि येथील मजुरांच्या कष्टाच्या घामाचा सुगंध यायला हवा. कोरोना संकटाचा सामना करताना 20 लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा करत आहे. हे पॅकेज देशाला आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत महत्वाची भूमिका बजावणार आहे. हे भारताच्या जीडीपीच्या तुलनेत 10 टक्के आहे असेही मोदी म्हणाले.
भारताने संकटाच्या घडीला देखील संधीत परिवर्तित केले असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, ``मी एका उदाहरणातून आपले म्हणणे मांडत आहे. जेव्हा कोरोना संकटाची सुरुवात झाली तेव्हा आपल्या देशात पीपीई किट बनत नव्हते. एन-95 मास्क सुद्धा भारतात नाममात्र म्हणून उत्पादित केले जात होते. आज घडीला भारतात रोज दोन लाख पीपीई किट आणि 2 लाख एन-95 मास्क तयार होत आहेत. आम्ही हे करू शकलो कारण, भारताने संकटाला संधीत बदलले. असे केल्याने भारताचा स्वावलंबनाचा संकल्प आणखी प्रभावी होणार आहे.