प्रकल्पबाधित ग्रामस्थांच्या घरांवर संकट
ठाणे :
भिवंडीतील प्रकल्पबाधित ग्रामस्थांच्या घरांवर संकट घोंगाऊ लागले आहे. गेल्या दीड महिन्यापासून कामे बंद असून ३ मेनंतरही लॉकडाउन उघडण्याची शक्यता नसल्याने राहायचे कुठे असा प्रश्न त्यांना पडला आहे. यापूर्वी हायस्पीड रेल्वे प्राधिकरणाच्या वतीने खासगी वकिलांकडून शेतकऱ्यांना घरे तत्काळ रिकामी करून देण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नवी घरे पूर्ण करण्याची घाई ग्रामस्थ करत होते. लॉकडाउनमुळे कामे अपूर्ण अवस्थेत राहिली आहेत. त्यात बुलेट प्रशासनाकडून कामे सुरू झाल्यास ऐन पावसाळ्याच्या तोंडावर राहत्या घराबाहेर पडण्याची वेळ ग्रामस्थांवर येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या अपूर्ण घरांच्या कामांना परवानगी देण्याची मागणी जोर धरत आहे. सिमेंटचा साठा पावसाळ्यामध्ये खराब झाल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे अर्थात बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भिवंडीतील भरोडी येथील ग्रामस्थांनी राहत्या घरांच्या जागा देऊन प्रकल्पाच्या मार्गातील अडथळा दूर केला, परंतु या प्रकल्पबाधितांनी नव्याने घरे बांधण्यास सुरुवात केल्यानंतर दोन ते तीन महिन्यांतच लॉकडाउनची घोषणा झाल्याने अनेकांच्या घरांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. घरासाठी आणलेले साहित्य, सिमेंट आणि इतर माल पडून असून पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण न झाल्यास साहित्याचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.