संशयित कोव्हीड - १९ रुग्णांनी शासनमान्य प्रयोगशाळेकडेच तपासणी करून स्वतःला क्वारंटाईन करुन घेण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन
ठाणे
ठाणे शहरातील कोरोना कोव्हीड – १९ ची प्राथमिक लक्षणे आढळणाऱ्या संशयित रुग्णांनी आपली कोव्हीड – १९ ची तपासणी आयसीएमआर प्राधिकृत प्रयोगशाळेमध्येच करून तपासणी अहवाल प्राप्त होई पर्यंत स्वतःला क्वारंटाईन करुन घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने निर्मित केलेल्या कोव्हीड - १९ तपासणीबाबतच्या मार्गदर्शकप्रणालीनुसार महापालिका क्षेत्रातील बरेचसे नागरिक सर्दी , खोकला , ताप घशामध्ये सूज येणे व अशक्तपणा येणे यापैकी कोव्हीड 19 ची कोणतीही किमान तीन लक्षणे आढळून आल्यास स्वतःहून खाजगी प्रयोगशाळेकडे परस्पर नेझोफॅरेंजियल स्वॅब तपासणीसाठी पाठवून परस्पर तपासण्या करुन घेत आहेत. मात्र असे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविल्यानंतर तपासणीचे अहवाल प्राप्त होईपर्यंतच्या कालावधीत ते स्वतःला क्वारंटाईन करुन घेत नाहीत. त्यामुळे स्वॅब तपासणी अहवाल प्राप्त होईपर्यंतच्या कालावधीत या व्यक्ती इतर व्यक्तींच्या संपर्कात येतात. यामुळे साहजिकच संशयित रुग्णांपैकी एखादा रुग्ण पॉझीटीव्ह आल्यास त्या रुग्णांपासून इतरांना कोरोनाची लागण होवू शकते. ही बाब अत्यंत गंभीर गंभीर असून हा संसंर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी ही खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
त्यामुळे संशयित कोरोना कोव्हीड - १९ रुग्णांनी कोव्हीड - १९ तपासणी करणे आवश्यक असल्यास अशा रुग्णांनी कोव्हीड - १९ तपासणी आयसीएमआर प्राधिकृत प्रयोगशाळेमध्येच करुन घ्यावी. मात्र त्यांनी कोरोना कोव्हीड - १९ ची लक्षणे दिसून आलेल्या दिवसापासून स्वतःला क्वारंटाईन करुन घेणे आवश्यक आहे. ज्यामुळे संशयित कोरोना सदृष्य रुग्णाचा संपर्क इतर रुग्णांशी येणार नाही व त्यामुळे कोरोना संशयित रुग्णापासून इतर सामान्य नागरिकांना कोरोनाचा कोणताही प्रादुर्भाव होणार नाही. तरी नागरिकांनी याची दक्षता घेण्याचे महापालिका आयुक्त श्री. सिंघल यांनी केले आहे.