ठाणे जिल्हा परिषदेच्या ५ हजार ३९५ ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता वाटप
*कोव्हिड१९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी अहोरात्र कार्यरत*
ठाणे
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून युद्धपातळीवर ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असणाऱ्या ५ हजार ३९५ कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता वितरित करण्यात आला आहे. याबाबत ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी निर्देश दिले होते. ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत.
या कामासाठी प्रत्येक्ष ग्रामीण भागात काम करणारे ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्ती, केंद्र चालक अहोरात्र कार्यरत आहेत. गाव पाडे वस्त्यांमध्ये जाऊन लोकांमध्ये जाणीव जागृती करणे, गावातील प्रत्येक भाग निर्जंतुकीकरणं करणे, गावात नव्याने आलेले नागरिकांचे सर्वेक्षण करणे, घरोघरी जाऊन लोकांना सूचना पालन करण्याचे आवाहन करणे, गरजू लोकांना अन्नधान्य पुरवणे, कम्युनिटीच्या किचनच्या माध्यमातून तयार जेवण देणे, मास्क, सॅनिटायझर आदी वस्तू गावात वाटणे अशी विविध कामे ही मंडळी नियमित करत आहेत. त्याचबरोबर या सगळ्या घडामोडींचा अहवाल लेखी स्वरूपात जिल्हा परिषद प्रशासनाला सादर करत आहेत.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जीवाचं रान करून सेवा बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनाव्यतिरिक्त प्रोत्साहन म्हणून एक हजार रुपये ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून वितरित करण्यात आले. जिल्ह्यात ४३० ग्रामपंचायती आहेत. यामध्ये ग्रामपंचायत सर्व कर्मचारी १६५८, अंगणवाडी कार्यकर्ती १५०७ अंगणवाडी मदतनीस ११९५, आशा कार्यकर्ती १०३५ असे एकूण ५३९५ कर्मचाऱ्यांना हा प्रोत्साहन भत्ता राज्य शासनाच्या निर्देशानुसार त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी( ग्रामपंचायत) चंद्रकांत पवार यांनी सांगितले.
ग्रामीण भागात खबरदारीच्या उपाययोजना युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे नियमित आढावा घेत आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि.नेमाने यांच्या नेतृत्वाखाली तालुका स्तरावरील गट विकास अधिकारी आणि जिल्हास्तरावरील नेमण्यात आलेले खातेप्रमुख वेळोवेळी ग्रामपंचायत स्तरावरील हालचाली वर लक्ष ठेवून आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे यांची नियंत्रणाखाली आरोग्य विभाग चोवीस तास कार्यरत आहेत. कोव्हिडचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्वतोपरी खबरदारी जिल्हा परिषद घेत आहे
तालुका निहाय आकडेवारी
अंबरनाथ ३७७
भिवंडी १८१०
कल्याण ५३१
मुरबाड ९९९
शहापूर १६७८
एकूण ५३९५