करोना संशयितांची परवड, प्रशासनाचे दुर्लक्ष- किरण चेंदवणकर

करोना संशयितांची परवड, प्रशासनाचे दुर्लक्ष- किरण चेंदवणकर


वसई


वसई-विरार शहर महापालिका हद्दीत करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर पालिकेच्या अलगीकरण केंद्रातील बाधितांची परवड होत आहे आणि त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पालिकेच्या वालीव येथील अलगीकरण केंद्रात  संशयितांना ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी त्यांना वेळेवर अन्न मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात येत आहे. याशिवाय येथे गरम पाण्याचीही व्यवस्था नसल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी रुग्णांच्या थुंकीचे नमुने घेत आहेत, त्यांच्या सुरक्षेकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नगरसेविका किरण चेंदवणकर यांनी सांगितले.


पालिकेच्या कौल सिटी येथील अलगीकरण केंद्राची अवस्थाही बिकट आहे. या ठिकाणी पुरेसे सफाई कर्मचारी नसल्याने केंद्रात स्वच्छता होत नसल्याचे चित्र आहे. सफाई कर्मचाऱ्यांअभावी पालिकेच्या विविध विभागांतील कामगार केंद्रात सफाई करतात. मात्र काम करताना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांना वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणेही पुरवली जात नाहीत. ही बाब केंद्रातील कर्मचाऱ्यांनी उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज यांच्याही निदर्शनास आणून दिली होती. या केंद्रावर महिनाभर पुरेल इतके साहित्य पाठवण्यात आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.