मीरा भाईंदरमध्ये पालिकेची 'ब्लड बँक' उभारणार !
ठाणे
मीरा भाईंदर शहरात 'कोरोना'चे पेशंट वाढण्याची भीती असून त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक मीरा भाईंदरमध्ये अनेक उपाययोजना योजत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काल ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी मीरा भाईंदरमध्ये आढावा बैठक घेतली. मीरा भाईंदरमध्ये पालिकेची स्वतःची ब्लड बँक नाही. त्यामुळे पालिकेची स्वतःची ब्लड बँक तयार करावी अशी मागणी सरनाईक यांनी केली असता हि मागणीही पालकमंत्र्यांनी मंजूर केली. या ब्लडबँकेला लागणारे साहित्य व निधी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मंजूर करण्यात आले आहे. ही ब्लड बँक टेम्भा हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे , असे सांगण्यात आले.
मीरा भाईंदर महापालिकेचे नगरसेवक आता आपापल्या प्रभागात ५ लाखापर्यंतचा नगरसेवक निधी 'कोरोना'ला हरविण्यासाठी जे उपाय करायचे आहेत त्यासाठी खर्च करू शकणार आहेत , अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील सगळ्या नगरसेवकांच्या नगरसेवक निधीतील ५ लाख पर्यंतचा निधी त्यांच्या प्रभागातील सॅनिटायजर , मास्क वाटप आणि औषध फवारणी करण्यासाठी 'स्प्रे मशीन' खरेदी करण्यासाठी खर्च करू शकणार आहेत. नगरसेवक निधीतुन ५ लाख रुपये खर्च करण्याच्या प्रताप सरनाईक यांच्या मागणीला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. तसेच आजवर मीरा भाईंदर पालिकेची स्वतःची ब्लड बँक नसून हि ब्लड बँक उभी करण्यासही मान्यता देण्यात आल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरा भाईंदर महापालिकेत आढावा बैठक घेतली. 'कोरोना'ला हरविण्यासाठी सरकार , मीरा भाईंदर महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. मीरा भाईंदरमध्ये सुरु असलेल्या व करावयाच्या उपाययोजना याबाबत पालकमंत्री शिंदे यांनी आढावा घेतला. या बैठकीत आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर शहराच्या दृष्टीने केलेल्या महत्वाच्या सूचना आणि मागण्या तात्काळ मान्य करण्यात आल्या आहेत. या बैठकीला खासदार राजन विचारे हेही उपस्थित होते.