ठाणे शहरावर सीसीटीव्हीची नजर

ठाणे शहरावर सीसीटीव्हीची नजर



ठाणे


शहरातील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, चौक येथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अशा प्रकारची गर्दी रोखण्यासाठी पालिकेने योजना आखली आहे. हाजुरी येथील नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आलेल्या या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून चित्रीकरण पाहून लगेच त्या ठिकाणी गर्दी हटवण्यासाठी पोलीस किंवा महापालिकेची पथके पाठवण्यात येणार आहेत. टाळेबंदीदरम्यान घराबाहेर न पडण्याचे आवाहन करूनही ठिकठिकाणी रस्त्यांवर, चौकांत घोळके जमवणाऱ्यांवर आता ठाणे महापालिकेची बारीक नजर राहणार आहे. 


गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हाजुरी येथील अत्याधुनिक नियंत्रण कक्षातील चित्रीकरण तपासले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी सोमवारी या कक्षात जाऊन तेथील कामकाजाची व प्रभाग समितीनिहाय शहरातील मुख्य ठिकाणांच्या सीसीटीव्ही चित्रीकरणाची पाहणी केली. तसेच या चित्रीकरणामध्ये नागरिकांनी गर्दी केल्याचे आढळून आले तर तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या ठिकाणी योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. करोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी विनाकारण कोणत्या वेळी घराबाहेर पडू नये आणि नियंत्रण कक्षात कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राला भेट देऊन तेथील करोनाच्या पार्श्वभूमीवर कामकाजाचा आढावा घेतला. या केंद्रामध्ये कोणत्या प्रकारचे दूरध्वनी येतात आणि त्यात करोनाविषयक किती दूरध्वनी असतात, याचा आढावा त्यांनी घेऊन तेथे नियुक्त केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये असलेल्या सुविधांचा अभ्यास करून या ठिकाणी काय करता येईल याची पडताळणी करण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या.


करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात टाळेबंदी करण्यात आली आहे. त्यातून किराणा माल, दूध, भाजीपाला, मटण, चिकन तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहेत. या दुकानांमध्ये नागरिकांनी खरेदी करताना सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, सामाजिक अंतराचा नियम पायदळी तुडवून नागरिक दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. काही ठिकाणी नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असून पोलिसांनी पकडल्यानंतर किरणा तसेच विविध वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडल्याची कारणे सांगत आहेत. त्यामुळे  पालिकेने प्रभाग समितीनिहाय दुकानदारांची मोबाइल क्रमांकासह यादी जाहीर केली आहे. माजिवाडा-मानपाडा, वर्तकनगर, लोकमान्यनगर, नौपाडा-कोपरी, उथळसर, वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा आणि दिवा या प्रभाग समितीनिहाय यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये किराणा माल, दूध, भाजीपाला, मटण, चिकन तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांचा समावेश आहे. नागरिकांनी महापालिकेने जाहीर केलेल्या दुकानदारांच्या क्रमांकावर संपर्क साधून घरपोच मागवावे, असे आवाहन ठाणे महापालिकेचे उपायुक्तसंदीप माळवी यांनी केले.