रंगपंचमीची हुल्लडबाजी रोखण्यासाठी ठाणे पोलिसांची पथके ठिकठिकाणी तैनात
महिला सुरक्षेसाठी ‘दामिनी’ची गस्त
ठाणे
ठाणे शहर पोलिसांनी यंदा पाच हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा होळी सणाचा ‘बेरंग’ करणाऱ्यांना रोखण्यासाठी तैनात केला आहे. पादचारी, प्रवासी यांच्या अंगावर फुगे फेकणे किंवा छेडछाड काढणे यांसारखे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच रेल्वे पोलिसांनीही रुळांलगतच्या वस्त्यांमध्ये फिरून फुगे फेकण्याचे प्रकार रोखण्यासाठी जनजागृती चालवली आहे. होळी आणि धूलिवंदन या सणांचा उत्साह वाढत चालला असताना, या सणांच्या निमित्ताने होणारी हुल्लडबाजी यंदाही चिंतेचा विषय बनली आहे. धुळवडीच्या दिवसांत रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांवर फुगे फेकण्याच्या घटना हमखास घडतात. या फुग्यांच्या माऱ्यांमुळे पादचाऱ्यांना गंभीर दुखापत झाल्याच्या घटनाही अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे ठाणे पोलिसांनी यंदा आठवडाभर आधीपासूनच बंदोबस्त वाढवला आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ शहरांतील काही महत्त्वाच्या भागांमध्ये पोलिसांकडून तपासणी करण्यात येणार आहे. तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या चार तुकडय़ा, ४०० ते ५०० गृहरक्षक यांच्यासह ठाणे पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी गस्त घालणार आहेत. यामध्ये फुगे फोडण्याच्या तक्रारी आल्यास संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
या काळात रेल्वे पोलीसही सज्ज झाले आहेत. कळवा आणि मुंब्रा भागांत मोठय़ा प्रमाणात रेल्वे रुळांलगत लोकवस्ती आहे. त्यामुळे अनेकदा या लोकवस्तींमधून रेल्वे गाडय़ांवर फुगे फेकून मारण्याचे प्रकार घडू नये यासाठी रेल्वे पोलीस कळवा येथील पारसिक बोगद्यावरील भास्करनगर, वाघोबानगर तसेच बोगद्याच्या मुंब्रा दिशेकडे जनजागृती करणार आहे. पोलीस कर्मचारी या वेळी मेगाफोनद्वारे नागरिकांना कायद्याविषयी जनजागृती करणार आहे. तसेच या परिसरातील शाळांमध्येही रेल्वे प्रवासी संघटनेच्या मदतीने माहिती देण्यात येणार आहे.
रंगपंचमी आणि होळीच्या दिवशी पोलिसांची ठिकठिकाणी गस्त असणार आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची पथके तयार आहेत. ठाणेकरांनी सण-उत्सव आनंदाने साजरे करा. मात्र, उत्सवाचा बेरंग होणार नाही याकडेही लक्ष द्या. अन्यथा उत्सवाचा बेरंग करणाऱ्यांवर गुन्ह्य़ाचे स्वरूप पाहून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- – विवेक फणसळकर, आयुक्त, ठाणे शहर पोलीस.