सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळा -- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
ठाणे
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व यंत्रणा दक्ष असून नागरिकांनी भयभीत न होता सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे. जिल्ह्यात करोनाचा संसर्ग पसरू नये व तत्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी नार्वेकर म्हणाले, शासनाच्या सूचनेनुसार राज्यात अनेक ठिकाणी यात्रा, सामूदायिक कार्यक्रम, मोहिमा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत. विविध संस्थांनी देखील पुढील किमान २५ दिवस शहरांमध्ये धार्मिक कार्यक्रम, मेळावे आयोजित करू नये तसेच नागरिकांनी सामूदायिक कार्यक्रम, मोहिमा, मेळावे यांच्यामध्ये सहभागी होवू नये . गर्दीच्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे . आवश्यकता असेल तरच प्रवास करावा. प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळल्यास प्रतिबंध करणे सहज शक्य आहे.
आपत्तीच्या प्रसंगी प्रशासनाला सहकार्य करण्याची जबाबदारी सर्वांचीच असते. संशयित अथवा रुग्णाचे नावं उघड झाल्यास विनाकारण त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना त्रास होऊ शकतो. तेव्हा नागरिकांनी सामाजिक भान ठेवावं. कुणीही रुग्णाचे अथवा संशयित व्यक्तीचे नावं उघड करु नये असे आवाहन श्री नार्वेकर यांनी केले आहे.
सार्वजनिक स्वच्छता राखणे आवश्यक- कोरोनाबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत जनजागृती करण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता बाळगणे आवश्यक आहे. वैयक्तिक स्वच्छतेबरोबर सार्वजनिक स्वच्छता राखणे तेवढेच महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. सार्वजनिक रुग्णालये, बस स्थानक, रेल्वे स्टेशन, बागबगिचा, चित्रपट्-नाट्यगृहे, मंदिरे या ठिकाणी थुंकू नका. परिसर स्वच्छ राहिल्यास अन्य रोग जंतूंचा फैलाव होणार नाही. रोगाचा प्रसार होणार नाही. थुंकताना अनेकांच्या अंगावर शिंतोडे उडतात. याची अजिबात फिकीर न करणारे ही दुर्देवाने आढळतात. अशा मंडळींना जबाबदारीची सर्वांनी जाणीव करून देण्याची गरज असल्याचे श्री नार्वेकर यांनी सांगितले.
अफवा पसरवणाऱ्यावर कारवाई - सोशल माध्यमांवर वृत्त वापरून तसेच स्क्रीन शॉटचा वापर करून कोरोनाविषयी अफवा पसरवण्यात येत आहेत. यावर सायबर सेलच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. अफवा पसरवणाऱ्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही श्री नार्वेकर यांनी यावेळी दिला आहे.
जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष कार्यान्वित- कोरोना व्हायरस प्रसार प्रतिबंध उपाययोजनेसाठी तसेच माहिती साठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाद्वारे नागरिकांच्या शंका तसेच समस्यावर मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच कोरोनाविषयी प्राप्त होणारे संदेश नोंदविण्यात येतील. या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०२२-२५३०१७४०, ०२२-२५३८१८८६ आहे.