ठाणे रेल्वे स्थानक पुर्वेला ७ हजार १८१ चौमीचे आरसीसी एलिव्हेटेड डेक बांधण्यात येणार

ठाणे रेल्वे स्थानक पुर्वेला ७ हजार १८१ चौमीचे आरसीसी एलिव्हेटेड डेक बांधण्यात येणार


ठाणे



रेल्वे स्थानकाबाहेरील बस, रिक्षा यांचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी पश्चिमेकडे एक पूल बांधून बसस्थानक तयार करण्यात आले. त्याचधर्तीवर पूर्वेकडेही ७ हजार १८१ चौमीचे आरसीसी एलिव्हेटेड डेक बांधण्यात येणार असून त्यावर प्रवाशांच्या सुविधेसाठी बसथांबे व इतर सोयी देण्यात येणार आहेत. ठाणे स्थानकाला पूर्वद्रुतगती महामार्गाशी थेट जोडणारा १२ मीटर रुंदीचा उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. बस टर्मिनलपर्यंत ८.५० मीटर रुंदीचा उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. स्थानक परिसरात वाहनतळाची उभारणी करणे तसेच रिक्षा व प्रवासी वाहनांसाठी तळमजल्यावरून स्वतंत्र मार्गिका यांचा समावेश आहे. या शिवाय स्थानकाची इमारतही उभारण्यात येणार असून हा प्रकल्प ३६ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.


ठाणे पश्चिमेप्रमाणेच पूर्वेसही रेल्वे स्थानकाबाहेर सॅटिस योजनेअंतर्गत उन्नत मार्गिका व वाहनांसाठी पूल (आरओबी) उभारण्याकरता कंत्राटदार मिळत नसल्याचे समोर आले आहे. रेल्वे हद्दीतून जाणाऱ्या पुलांची कामे करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या परवानग्या मिळवताना दमछाक होत असल्याने काम वेळेत पूर्ण करणे कठीण होते व त्यामुळेच अनेक कंत्राटदार रेल्वे हद्दीतील कामांकडे पाठ फिरवत आहेत. त्याचाच फटका या कामासही बसला असून ३५ कोटींच्या कामासाठी पुन्हा निविदा काढण्याची वेळ आली आहे. कंत्राटदार मिळेपर्यंत सॅटिस-पूर्वचे काम रखडणार आहे.


प्रकल्पासाठी २६०.८५ कोटींचा खर्च अंदाजित करण्यात आला आहे. यापैकी पूर्वेकडील एलिव्हेटेड डेक बांधण्याच्या निविदा प्रसिद्ध करून कंत्राटदाराची नियुक्ती झाली आहे. सॅटिस प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असले तरी या डेकपासून ते पूर्वद्रुतगती महामार्गापर्यंतचा उन्नत रस्ता आणि आरओबीच्या (पूल) कामासाठी मात्र आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. रेल्वे हद्दीतून हा उन्नत रस्ता जात असल्याने पूल गरजेचा आहे. आरओबी बांधणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांची संख्या मर्यादित असल्याने ठाणे महापालिकेच्या या सॅटिस प्रकल्पाच्या निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. रेल्वेच्या परवानग्यांच्या वेळखाऊ प्रक्रियेमुळे कंत्राटदार कंपन्या या कामाकडे पाठ फिरवतात. आता निविदांच्या पुनर्प्रक्रियेत कंत्राटदार मिळणार का, याकडे लक्ष आहे.