मफतलाल तलावातील दूषित पाण्याचा भाजी धुण्यासाठी वापर
ठाणे :
रेल्वे ट्रॅक नजीकच्या जागेत तसेच ठाणे शहरातील विविध ठिकाणी भाजीचे मळे असून या भाजीपाल्यांसाठी सांडपाणी मिश्रित अस्वच्छ पाणी वापरले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त् झाल्या, यानुसार महापौर नरेश म्हस्के यांनी अतिरिक्त आयुक्त 1 यांच्या उपसिथतीत सर्व सहाय्यक आयुक्त व विविध विभागाची तातडीची बैठक घेतली. दूषीत पाणी वापरुन भाज्यांची लागवड ठाणे शहरात ज्या ज्या ठिकाणी होत आहे, त्याची चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले.
ठाणे शहरात रेल्वे रुळाशेजारी तसेच खुल्या जागेत पालेभाज्या पिकविण्यासाठी नाल्यातील सांडपाणी वापरले जात असल्याची बाब सातत्याने पुढे येत आहे. यााबाबत महापालिका अधिकाऱ्यांनी एक विशेष बैठक घेतली होती. त्यावेळी अशी शेती करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी दिले होते. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे भाजीमळे उद्ध्वस्त केले होते. ठाणे महापालिकेने दोन महिन्यांपूर्वीच सांडपाण्याचा वापर करून पिकवण्यात येणाऱ्या भाजीपाल्यांच्या मळ्यांवर जोरदार कारवाईचा बडगा उगारला होता. असे असले तरी महापालिकेच्या या कारवाईत खंड पडल्याने कळव्यातील मफतलाल परिसरात पुन्हा सांडपाण्याचा वापर करून भाजीपाल्याचे मळे फुललेले पाहायला मिळत आहेत. तसेच या मळ्यात पिकणाऱ्या पालेभाज्या धुण्यासाठी मफतलाल तलावातील दूषित पाण्याचा वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.
असे असले तरी अवघ्या दोन महिन्यात महापालिका प्रशासनाच्या या कारवाईत खंड पडला आहे. त्यामुळे कळव्यातील मफतलाल परिसरात सांडपाण्याच्या साहाय्याने पिकवले जाणारे हे भाजीमळे पुन्हा फुलले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कळव्यातील मफतलाल परिसरात तलाव असून या तलावातील पाण्याचा वापर हा अनेक जण आंघोळीसाठी तसेच कपडे धुण्यासाठी करतात. तसेच परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या घराचे सांडपाणीही या तलावात सोडल्याचे दिसून येते. त्यामुळे या तलावाचे पाणी दूषित झाले असून पाण्याला दुर्गंध येत आहे. त्यातच मफतलाल परिसरात सांडपाण्याचा वापर करून पिकणारा भाजीपाला धुण्यासाठी या दूषित पाण्याचा वापर करण्यात येत असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे.