बुधवारपासून ३१ मार्चपर्यंत बाजार पूर्णपणे बंद, भाजीपाला महागण्याची शक्यता

बुधवारपासून ३१ मार्चपर्यंत बाजार पूर्णपणे बंद, भाजीपाला महागण्याची शक्यता



नवी मुंबई

नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबईला होणारी भाज्यांची आवक बुधवारपासून बंद होणार आहे. भाज्या पोहोचवण्यास वाहतूकदारांनी असमर्थता दर्शवल्यामुळे व मागणी घटल्यामुळे व्यापारी मंगळवारी उरलेला सर्व माल विकतील. त्यानंतर बुधवारपासून ३१ मार्चपर्यंत मात्र बाजार पूर्णपणे बंद असेल. त्यामुळे भाजीपाला महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

करोनाच्या उद्रेकामुळे सध्या रस्त्यावरील भाजीबाजार, मॉल्स तसेच हॉटेल्स व रेस्टॉरंटसुद्धा बंद असल्याने भाज्यांची मागणी घटली आहे. यामुळे बाजारात भाज्यांच्या गाड्या विक्रीविना पडून आहेत. अशा जवळपास ४५० गाड्या भाज्यांची सोमवारपर्यंत विक्री झालीच नव्हती. मुंबई शहर व उपनगरासह ठाणे जिल्ह्याची रोजची मागणी एरव्ही ६०० ट्रकच्या घरात असते. पण सध्या भाज्यांची खरेदी-विक्री असलेली अनेक ठिकाणे बंद असल्याने ही मागणी ३०० किलोपर्यंत उतरली आहे. यातूनच ४५० ट्रक भाजी शिल्लक असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

याबाबत घाऊक भाजीपाला महासंघाचे सचिव प्रशांत जगताप म्हणाले, 'रविवारी बाजार बंद होता. सोमवारी निर्जंतुकीकरणासाठी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. त्याचवेळी मागणी खूप कमी झाल्याचे माल भरपूर शिल्लक आहे. याशिवाय वाहतूकदारांनी भाज्या पोहोचवण्यास नकार दिल्याने नगर किंवा नाशिकहून भाज्या येणार नाहीत. यामुळेच मंगळवारी शिल्लक माल विक्री केला जाईल. त्यानंतर मात्र करोणा संसर्ग रोखण्यासाठी बुधवारपासून बाजार बंद केला जाईल.'