कोकणातील चाकरमन्यांच्या गणेशोत्सवाकडे सरकारचे दुर्लक्ष

कोकणातील चाकरमन्यांच्या गणेशोत्सवाकडे सरकारचे दुर्लक्ष


ठाणे


देशात सध्या राम मंदीर निर्माण कार्याचे वारे वाहत असताना महाराष्ट्रातील गणेशोत्सवाकडे मात्र राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप कोकणातील चाकरमन्यांनी केला आहे.  गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष रेल्वे गाडया सोडण्यासाठी विनंती अर्ज, निवेदने तसेच विविध ७० हुन अधिक सार्वजनिक मंडळांच्या पाठींब्याची व्हॉटसअप मोहीम राबवल्यानंतरही सरकारला इकडे लक्ष द्यायला वेळ नाही. यावर कोणत्याही प्रकारचा तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे  अखेर कोकणातील गावकऱ्यांना सरकारनेच सुचना करावी अशी विनवणी कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी गणेशोत्सव हा विशेष सोहळा असतो. त्यासाठी विशेष रेल्वे सेवा सुरू करावी म्हणून कोकण रेल्वे प्रवासी संघटनेमार्फत अनेक अर्ज, निवेदने देण्यात आली. मात्र सरकार बधत नसल्याने चाकरमानी संतप्त झाले आहेत. तेव्हा सरकारनेच कोकणातील सर्व ग्रामपंचायत समिती, गावकरी बंधूना आवाहन करण्याची मागणी संघटनेने केली आहे. टाळेबंदीनंतर चाकरमान्यांचे नोकरी व्यवसाय सुरु झाले असले तरी अनेकांच्या नोकऱ्या, उद्योग व्यवसाय बंद झाले आहेत. त्यात ग्रामपंचायतीने चाकरमान्यांना १४ दिवस अगोदर गावी येऊन क्वारंटाईन राहण्याचा फतवा काढला.


हे १४ दिवस आणि उत्सवाचे १२ दिवस असे एकूण २६ दिवस रजेचे होतील. तेव्हा,ग्रामपंचायत समिती आणि गावकरी यांनी, गावातील ज्याचे संपूर्ण कुटुंब परजिल्हात,परराज्यात आहेत अशाच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना ग्रामपंचायतीच्या वतीने करून ५ ते १० दिवस उत्सव आणि बाप्पाचं विसर्जन नियमावलीनुसार कुठलीही हेळसांड न करता करावे. त्यामुळे गावकरी बंधूना आणि ग्रामपंचायत समितीला गावी येणाऱ्या चाकरमान्यांचा त्रास होणार नाही आणि घराघरात गणपती उत्सवही साजरा होईल. चाकरमान्यांनादेखील नोकरी गमवावी लागणार नाही अशा आशयाचे निवेदन संघटनेचे प्रमुख राजु कांबळे आणि अध्यक्ष सुजीत लोंढे आदिनी मुख्यमंत्री उदधव ठाकरे आणि रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.