घोडबंदर मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टिकुजीनी वाडी ते बोरीवली या भुयारी मार्गाबाबत गती देण्यासाठी 10 ऑगस्ट 2016 रोजी संसदेत खासदार राजन विचारे यांनी शून्य प्रहरामार्फत मुद्दा उपस्थित केला होता, या कामाला वनखात्याची परवानगी न मिळाल्याने विलंब लागत होता. या प्रकल्पाच्या तसेच घोडबंदर रोडच्या वाहतूक कोंडीवर काय उपाययोजना संबंधित विभागाकडून करण्यात आली आहे, असा ही सवाल त्यावेळी केला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत तातडीने गायमुख ते फाऊंटन हॉटेल असा 4 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्गाचा प्रस्ताव बनविण्यात आला.
24 नोव्हेंबर 2017 रोजी राज्य मंत्रिमंडळाची सदर प्रस्तावास 667 कोटींची प्रशासकीय मान्यता मिळवली. खासदार राजन विचारे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांसोबत एकत्रित पाहणी आणि बैठक आयोजित करून या प्रकल्पाला चालना व गती दिली. तसेच या प्रकल्पासाठी लागणारी वन खात्याची जागा मिळवून देण्यासाठी अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांनी सदर जागा महिन्याभरात मिळवून देऊ, असे आश्वासन खासदार राजन विचारे यांना दिले. खासदार राजन विचारे यांनी येणाऱ्या नवीन वर्षात या कामाची सुरुवात करू, असे सांगितले.