नालासोपारा पोलीस हवालदार आत्महत्या प्रकरण, पोलीस निरीक्षकाची बदली

 

नालासोपारा : तुळिंज पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सखाराम भोये यांच्या आत्महत्येप्रकरणी अखेर पोलीस आयुक्तांनी कारवाई केली आहे. तत्कालीन पोलीस निरीक्षक जयकुमार सुर्यवंशी यांची मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तर माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांची तुळिंज पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. तुळिंज पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस हवालदार सखाराम भोये यांनी 24 डिसेंबर रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या रेस्ट रुममध्येच सरकारी रिव्हॉल्वरने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलीस निरीक्षक जयकुमार सुर्यवंशी यांच्यावर दोषी असल्याचा आरोप करण्यात आला होता.

42 वर्षीय सखाराम भोये हे आपल्या परिवारासह नालासोपारा पश्चिमेकडे राहत होते. त्यांच्या पश्चात एक 12 वर्षांचा मुलगा आणि पत्नी आहे. भोये हे 2003 च्या बॅचमध्ये पोलीस भरती झाले होते. जून 2017 पासून ते तुळिंज पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते.

ब्रिटन मधील कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात होऊ नये यासाठी संपूर्ण राज्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काल बुधवारपासून मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात रात्रीची संचार बंदी सुरु झाली आहे. त्यामुळे सर्वच पोलीस रात्रीच्या गस्तीवर कार्यरत आहेत. सखाराम भोये हेही रात्री तुळिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर कार्यरत होते. सुमारे साडे आठ ते 9 च्या दरम्यान त्यांनी पोलीस निरीक्षकाच्या रेस्ट रुममध्ये जाऊन त्यांनी सरकारी रिव्हॉल्व्हरने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती (Police Constable Committed Suicide On Duty).

हवालदाराच्या आत्महत्येनंतर डहाणूचे आमदार सुनील भुसारा, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहून, तुळिंज पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली होती. भोये यांनी मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप होता.