उपचाराअभावी वृद्धाचा स्ट्रेचरवरच तडफडून मृत्यू
ठाणे
शांतीनगर येथे राहणाऱ्या या ७० वर्षांच्या वृद्धाची प्रकृती बिघडली होती. त्यांना सलग दोन दिवसांपासून ताप येत होता. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता होती. पहिल्या दिवशी त्यांच्या मुलाने पालिकेकडे अॅम्ब्युलन्स व रुग्णालयाचे नाव देण्याची विनंती केली. मात्र, प्रशासनाने काहीही न कळविल्याने त्याने थेट एका रुग्णालयात संपर्क साधून वडिलांना दाखल करण्याची विनंती केली. परंतु, महापालिकेच्या डॉक्टरांनी फोन केल्याशिवाय आम्ही कोणालाही दाखल करून घेणार नाही, असे त्या रुग्णालयाने सांगितले. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी नगरसेवक नारायण पवार यांनी डॉ. राजू कोर्डे यांच्याशी संपर्क साधून त्या वृद्धाला दाखल करण्याची विनंती केली. अखेर पाचपाखाडी येथील एका रुग्णालयात रात्री नऊच्या सुमारास सामान्य कक्षात जागा असल्याचे महापालिकेने सांगितल्यावर वृद्धाला तेथे नेले. मात्र, लगेचच दाखल करून न घेतल्याने त्यांची प्रकृती बिघडली. काही काळानंतर तेथील डॉक्टरांनी या रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल करण्याची गरज आहे. मात्र, आमच्याकडे जागा शिल्लक नाही. तुम्ही दुस या हॉस्पिटलमध्ये चौकशी करा, असे सांगितले. या दरम्यानच उपचाराअभावी त्या वृद्धाचा स्ट्रेचरवरच तडफडून मृत्यू झाल्याचे पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
अॅम्ब्युलन्सअभावी रुग्णालयातून डिस्चार्ज थांबविले महापालिका क्षेत्रात अॅम्ब्युलन्सची संख्या कमी असल्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची ने-आण करण्यात अडचणी येत आहेत. पाचपाखाडीतील एका रुग्णालयात गुरुवारी दुपारी चार रुग्णांचा डिस्चार्ज झाला होता. मात्र, ते महापालिकेची अॅम्ब्युलन्स नसल्यामुळे रुग्णालयातच थांबले होते. त्यांना खासगी रुग्णवाहिकांच्या चालकाने १० ते १५ हजार रुपये दर सांगितला होता. त्यामुळे नाइलाजास्तव सर्व रुग्ण ताटकळत होते. पर्यायाने कोरोनाच्या अन्य रुग्णांनाही दाखल केले जात नव्हते. त्यामुळे महापालिका व रुग्णालय यांच्यात समन्वय नसल्याचे उघड झाले आहे.