शहर विकास विभागातून २०० फाइल्स आयुक्तांच्या बंगल्यावर- नारायण पवार
ठाणे
ठाण्यातील भाजप नेत्यांनी आयुक्त संजीव जयस्वाल याच्या बंगल्यावर शहर विकास विभागातून २०० फाइल्स पाठविण्यात आल्याचा खळबळजनक आरोप पक्षाचे माजी गटनेते नारायण पवार यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास मर्जी असल्यामुळे जयस्वाल यांना ठाणे महापालिकेत पाच वर्षे आयुक्तपद उपभोगता आले. मध्यंतरीच्या काळात जयस्वाल यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मातोश्रीवरही जुळवून घेतले. त्यामुळे चार वर्षांनंतर एक वर्षांसाठी त्यांना मुदतवाढ देण्याचाही निर्णय घेण्यात आला. मात्र आता त्यांनी आपला पदभार सोडला आहे.
शहर विकास विभागातून आयुक्तांच्या बंगल्यावर एकाच वेळी दोनशे ते तीनशे फायली पाठवण्यात आल्या. या फायलींवर स्वाक्षऱ्या करून आयुक्तांनी त्या मंजूर केल्याचा आरोप करत भाजप नगरसेवक नारायण पवार यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. यासंदर्भात पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना पत्र पाठवले आहे. ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागातील काही प्रकरणांमध्ये सीबीआय चौकशी सुरू असून, न्यायालयात विविध जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत, तर काही प्रकरणांमध्ये मंत्रालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा प्रकार संशयास्पद आहे, असा आरोप पवार यांनी केला आहे. शहर विकास विभागातील आवक-जावक नोंदीचा तपशील तपासावा. या ठिकाणी तपशील नसल्यास शहर विकास विभाग, महापालिका मुख्यालय आणि आयुक्त निवासस्थान परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज घेऊ न चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.